|
श्री. देवेंद्र फडणवीस - भाजपा अध्यक्ष
महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष, एक अभ्यासू, मनमिळावू आणि सतत संघर्षशील
राहणारे व्यक्तिमत्व श्री. देवेंद्र फडणवीस यांचा जन्म २२ जुलै १९७० रोजी नागपूर जिल्ह्यात
झाला. उच्च विभूषित असलेले देवेंद्रजी यांनी एल.एल.बी., बिझनेस मॅनेजमेंट व डी.एस.ई
बर्लिनमधून मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट इत्यादी विषयात पदविका प्राप्त
केल्या आहेत. ९०च्या दशकात त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला प्रारंभ केला. राजकीय
पक्ष आणि जनप्रतिनिधी अशा दोन्ही आघाड्यांवर काम केले आहे. १९९२ ते १९९७ अशा दोन कालखंडात
नागपूर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. लहान वयात नागपूरचे महापौर पद भूषविले,
सर्वात कमी वयाचे ते देशाचे दुसरे महापौर होते.
१९९९ नागपूरातून त्यांना पक्षाने उमेदवारी दिली व ते आमदार झाले. सलग १३ वर्षे विधानसभेत
असताना त्यांनी अंदाज समिती, गृह व नगरविकास खात्याची स्थायी समिती , कायदा समिती ,सार्वजनिक
उपक्रम समिती , महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आदी क्षेत्रात काम केले आहे. बोलण्यात संयम
आणि एखाद्या विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी यामुळे कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनचा सर्वोत्कृष्ट
संसदपटूचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. १३ वर्षे आमदारकीच्या काळात राज्याचाच अर्थसंकल्प
नव्हे, तर देशाचा अर्थसंकल्पाचा सखोल अभ्यास त्यांनी केला. दरवर्षी केंद्रीय अर्थसंकल्पावर
नागपूरात त्यांचे भाषण होत असते आणि तज्ञांकडून त्यांची प्रशंसा केली जात होती.
|